दक्षिणोत्तर वाहणार्या मंडा ओढयाच्या काठावर श्रीमंडादेवीचे मंदिर आहे.मंडा ओढयाच्या बाजूला पूर्वेला एक छोटा दरवाजा आहे.त्याच्या आजूबाजूला तटबंदीचे पडके अवशेष दिसतात.
मंदिर दक्षिणाभिमुख आहे.दक्षिणेला असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पायर्या उतरून आपण एका छोट्या प्राकारात येतो.लगोलग उजव्या हाताला एक छोटी पाण्याची बारव आहे.बारव पक्की बांधलेली आहे.त्यात उतरायला पायर्या आहेत. पायर्या उतरताच डाव्या हाताला देवीच्यासमोर श्रीगणेश मंदिर आहे.ही उत्तराभिमुख गणेशमूर्ती ओबडधोबड आहे.या प्राकारातच गणपतीच्या डाव्या बाजूला आणि देवीच्या उजव्या बाजूला महादेवाचे मोडकळीला आलेले पूर्वाभिमुख मंदिर आहे.याचे नाव श्रीमंडेश्वर.सभामंडप आणि गाभार्याचे बांधकाम मजबूत आहे.
मंडादेवीचे मंदिर सुमारे ७व्या शतकातील असावे.शिखराभोवती चार मोठे मीनार असून कमानी इस्लामी शैलीच्या आहेत.वीर धरणाचे पाणी मंदिराच्या पायात जात असूनही मंडादेवीचे मंदिर संपूर्ण व सुस्थितीत आहे.